Stories of my life #006 - आठवण
आठवण
आठवतो
पहाटे दारात पडलेला शुभ्र प्राजक्ताचा सडा
अन् सकाळी
आजोबांच्या रेडिओ वर गात असलेल्या माणिक वर्मा
आठवतो
शाळे साठीचा रोजचा प्रवास
चेहर्यावरचा गार वारा, वार्यावर उडणारे केस
अन् भरभरून घेतलेला श्वास
आठवते
बेझिझक पहुडणे अंगणात
निरखत पक्ष्यांचे थवे त्या शामल आभाळात
आठवतात स्पर्श
काही मोहरून सोडणारे,
काही कोमेजून टाकणारे
आठवतात नजरा
काही ज्यांनी मनात घर केले
तर काही ज्यांनी घुसमटून टाकले
आठवते आई ची गरम पोळी
अन् आठवतात बाबां सोबत म्हणलेली गाणी
आठवतात पेपरातले 'मुग्ध मधुर' चे लेख
अन् आठवते टिपणे मनोगते वहीत कित्येक
आठवते रंगपंचमी ची धमाल
दिवाळीची पहाट
गणपतीची मीरवणूक
आणि हळदी कुंकवाचा थाट
आठवतात हौसेने शिवलेले कपडे
लग्नघरी बांगड्यांचे भरलेले घाणे
मेहंदी रंगण्या साठीचा खटाटोप
अन् शाहरूख च्या सिनेमा चा जल्लोष
आठवते बरेच काही
काही लख्ख काही धुसर
अन् सोबतीला असतात शब्द
मन जेव्हा होते असे कातर.
- तेजस
2022 जून 03
ReplyDelete#marathikavita #athvan #memories #marathipoetry #poetry #childhoodmemories #memoriesofindia #swades